Friday 2 December 2022

'दृश्यम 2' एक रहस्य तुम्हा आम्हा सगळ्यांना उलगडलं पण 'त्यांना' नाही

 



बऱ्यापैकी आताचे आलेले सिक्वेल हे निराशाजनकच आहेत असं वाटत होतं. मात्र दृश्यम 2 ने हा दृष्टीकोन बदलला. पहिल्या भागापेक्षाही अति उत्सुकता ताणून ठेवणारा हा सिनेमा आहे. तुम्ही अगदी पहिल्या सीनपासून प्रत्येक क्षण तितक्याच उत्सुकतेनं पाहता. 7 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना सतत आपल्या डोळ्यासमोर येत राहतात. पोलीसही केस पुन्हा ओपन करतात पहिल्या भागाप्रमाणेच पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागत नाही. 

एक सीन असा येतो की वाटतं सगळं संपलं आता सत्य समोर येणार आणि विजय सालगावकर तुरुंगात जाणार. मात्र लेखक आणि दिग्दर्शकाने अशी काही जादू केली आपणही चाट पडतो. ही तर सुरुवात आहे, अजून बरंच बाकी आहे. 

दृश्यमचा पहिला भाग जेवढा सरळ होता त्यापेक्षा दृश्यम 2 जास्त इंटरेस्टिंग आहे. घी सीधी उंगलीसे ना निकाले तो टेढी करनी पडती है. त्याच प्रमाणे पोलीस पुन्हा तीच 7 वर्षांपूर्वीची केस ओपन करतात पण शेवटपर्यंत त्यांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नाही.

विजय सालगावकर म्हणजेच अजय देवगणने एक सामान्य नागरिक असून खूप परफेक्ट प्लॅनिंग करून या गोष्टी केलेल्या असतात. त्याने होणाऱ्या परिणामांचाही विचार केलेला असतो. 

तीन सीन असे आहेत जेव्हा असं वाटतं की आता पत्नी सगळं सांगून टाकेल. काही गोष्टी ती नकळत बोलून जाते. त्यातूनही विजय सालगावकर कसं डोकं लावून कुटुंबाला बाहेर काढतो. त्याचं प्लॅनिंगच एवढं जबरदस्त असतं की आपण विचारही करू शकत नाही. इकडची गोष्ट तिकडच्या बोटावर करावी तेवढं अगदी उत्तम पद्धतीने तो या गोष्टी हाताळतो. 

सिनेमात त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे. मी नेहमी मनं आणि बुद्धी यामध्ये माझ्या बुद्धीचं ऐकत आलो आहे आजही तेच करणार. तो शेवटपर्यंत रहस्य आपल्या कुटुंबाकडे उलगडत नाही. साम-दाम-दंड-भेद सगळ्या प्रकाराने पोलीस प्रयत्न करतात. पोलीस हत्या कुणी केली आणि देशमुखांच्या मुलाची हत्या झाली इथपर्यंत म्हणजे सत्यापर्यंत पोहोचतात मात्र त्यांना एकही पुरावा मिळू शकत नाही. तो का मिळू शकत नाही हे पाहाणं जास्त मजेशीर आहे. पुराव्या अभावी पुन्हा एकदा विजय सालगावर या सगळ्यातून सुटतो. 

शेवट तर आणखी भन्नाट आहे. विजय सालगावकर एक स्टोरी लेखकाला सांगतो. त्यावर त्याला सिनेमा काढायचा असतो. ही स्टोरी त्याची स्वत:ची असते असं ती स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला समजतं. पण त्याचा पुढचा क्लायमॅक्स तो लेखकासोबत बसून तयार करतो आणि पुढे कसं ते घडत जातं हे त्यामध्ये दाखवलं आहे. मी या सिनेमाला 10 पैकी 10 स्टार देईन.

का पाहावा दृश्यम 2

- पहिल्या भागापेक्षाही अति उत्सुकता निर्माण करणारा 

- गाण्याचा भडीमार नसलेला

- प्रत्येक क्षण तुम्हाला पुढे काय घडेल याची उत्सकता जागृत करतो

- उत्तम कथा आणि अभिनय यासाठी पाहावा

- सिनेमॅटोग्राफीही उत्तम आणि प्लॉटिंग सुंदर

- प्रत्येक दृश्यं आपल्याला पुढचा सीन पाहायला भाग पाडतात, तुम्ही कुठेच दोन तास बोर होत नाही

दृश्यम सिनेमातून काय शिकायचं?

उत्तम नियोजन आणि दूरदृष्टी

तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या फक्त तुमच्या बुद्धीला पटल्या पाहिजेत

तुम्ही जे ठरवलंय किंवा जे करताय ती कुठेही बोलू नये, त्यामुळे नुकसानच होतं

तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पुढे काय घडेल त्यासाठी तुमचं किती नियोजन आहे याची आधीच कल्पना असायला हवी


क्रांती रविंद्र कानेटकर

Friday 11 February 2022

#marriage story : लग्न का करावं? मला पडलेले काही प्रश्न

सध्या सोशल मीडियावर किंवा लग्नात एक टोमणा सहज मारला जातो आमच्यावेळी सगळं अॅडजेस्ट झालं. कुठे बिघडलं काही? आजकालच्या मुलींना अक्कल जरा जास्तच आहे नाही का? म्हणून त्यांच्या मागण्या वाढतात. आजकालच्या मुलींना वेळेत लग्न नको असतात. मुलांचं प्लॅनिंग नको असतं. असे एक नाही अनेक बोल सहज लावले जातात. हे बोल लावणाऱ्यांमध्ये महिलाही मागे नाहीत हे विशेष आहे. 

या मुलींना जरा जुळवून घ्यायला नको असतं. प्रत्येक छोट्या गोष्टीला डोक्यावर घेतात. जरा म्हणून अॅडजेस्टमेंट नाही. आमचं सगळं व्यवस्थित झालं कुठे बिघडलं काही.... खरंच कुठे बिघडलं काही... जे बिघडलं ते तुम्हाला पाहाता तरी आलं का? तेवढा डोळसपणा असता तर हा प्रश्न किंवा ही शंका मनात राहिलीच नसती.

मुली जरा शिकल्या, चांगल्या नोकरीला लागल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. आता सगळंच बिघडलं इथे काहीसं... वाटलं ना आश्चर्य. पहिल्यापासून पितृसत्ताक पद्धत असल्याने काही गोष्टी ह्या सहाजिकच समोरच्या मनात खूपत असतात. बोलणारे बोलत असतात. 

ती आपल्यापेक्षा वरचढ होतेच कशी? कमावयला लागली म्हणजे जास्त अक्कल आली का?  हेच मुळाच अनेक ठिकाणी मानसिकता असते. ती उधळी आहे, तिने फक्त घर बघावं, नवऱ्याच्या पोटाला चांगलं चुंकलं खायला करून खायला घालावं, सणवार करावेत आणि त्यानंतर मग नोकरी करून घरात चार पैसे आणले तर तेही घरासाठी खर्च करावेत अर्धे अर्धे. म्हणजे इथे पैसे अर्धे करण्याबाबत समानता असते बरं का? पण घरातली काम वाटून घेण्यामध्ये नाही. का कशासाठी याचं उत्तर नाही. (मुलगा किंवा मुलगी दोन्ही  बाजूनं काहीशी हीच स्थिती आहे)

यालाही काही ठिकाणी नक्कीच अपवाद आहेत नाही असं नाही. पण लग्नाआधी प्रत्येक मुलीला काही गोष्टींचे धडे दिले जातात. बघ सगळं तुला अॅडजेस्ट करून घ्यायचं आहे. वाद झाला तरी आपण गप्प राहावं, जास्त बोलू नये वाद वाढतात. सगळं घर मुलीच्या खांद्यावरची जबाबदारी आहे सांभाळून ठेवायची. 

आपण बोलून वाद वाढवू नये. नवऱ्याचं ऐकावं. आपलं घर बांधून ठेवावं, पण मला एक प्रश्न आहे...मुलाकडे असं समजावलं जात असेल का? बायकोला मदत करावी, वाद टाळावेत, बायकोची साथ द्यावी, बायकोच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहावं यासारख्या अनेक गोष्टी....

गेल्या वर्षभरात माझ्या ऐकण्यात पाहण्यात किंवा अनुभवात आलेली वाक्य तर फार भयंकर आहेत. त्यावरून मला एकंदरीत असं वाटलं की एकतर मुलीला मोलकरीण समजतात किंवा विकायला ठेवतात तशी वस्तू समजतात. माफ करा असं म्हणण्याचं कारण म्हणजे ऑनलाइन नाव नोंदवलंय सब्स्क्रिब्शन संपण्याआधी लग्न जमलंच पाहिजे. नाहीतर पैसे वाया जातील असं कोण म्हणत असावं?  

मुलगा कसाही असला तरी आम्हाला चालेल पण तो जातीतलाच पाहिजे. मग पगारही कमी का असेल किंवा आणखी त्याच्यातील त्रुटीही मान्य. अरे बाकी सगळं तर चांगलं आहे नोकरीच सोडायला सांगतोय ना मग कुठे बिघडलं? सोड नोकरी काय त्या नोकरीत ठेवलेलं.

सकाळ संध्याकाळ जेवण करून घरातील सणवार करणारी आणि सगळं सांभाळणारी मुलगी पाहिजे. नाहीतर मुलगी नको. नोकरी करणारी तर हवी पण शनिवार रविवार सुट्टी हवी. 

सणवाराला सुट्टी हवी घरातलं कोण करेल. मी तर बुआ आईला आजारी असतानाच मदत केलीय तर आता तिनेच पाहायला हवं. आता गंमत अशी आहे की दुसरी बाजू मुलाची पण आहे बरंका ती फार मजेशीर आहे. 

बायकोला पाठिंबा दिला तर आई आणि समाजाच्या नजरेत बायकोचा बैल, नवरा-बायकोनं वाद टाळण्यासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तर हेच लोक उद्या घर फोडलं म्हणून ओरडणार. मुलगी स्वत:च्या पायावर उभं राहिली किंवा तिला सपोर्ट केला तर भाई इगोच हर्ट होतो. घरातल्यांचा तरी नाहीतर.... समजून घ्या. 

आता यामध्ये आंतरजातीय विवाह आणि मुलगा चांगला असणं हे भाग आणखीन वेगळे आहेत. कारण इथे समाज आणि काईंड ऑफ मानसिकता, वातावरण, वागणूक असे अनेक कंगोरे निघतात. 

या अख्ख्या लग्नाच्या धिंगाण्यात कोणीच हे पाहात नाही की मुलगी स्वत: 2 पैसे कमवायला शिकली तर अडीअडचणीला तिची मदत होईल. 

मुला-मुलीचं पटलं तर उद्या त्यांचा संसार सुखी होईल. आपल्याकडे जी बोलणारी तोंड आहेत ती कधीच मदतीला येत नाहीत. बोलणाऱ्यांना आज तुमचा विषय आहे उद्या दुसऱ्यांचा मिळेल. 

आज मुलगा चांगला कर्तुत्ववान आहे की नाही तो सपोर्ट करणारा आहे की नाही हे पाहायचं सोडून अजूनही आपण त्याच त्याच गोष्टीत गुरफटतोय. त्यातून होणारे वाद, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, छळवणूक आणि घुसमट ही दिवसेंदिवस वाढणारी आहे. ही फक्त मुलींचीच असं नाही बरं मुलांचीही तेवढीच आहे. 

डिमांड फक्त मुलींच्या दिसतात पण मागणी घालणाऱ्या कुटुंबाच्या नाही. ते मागणी करतात ती डोळ्यात दिसणारी नसते पण मुलीच्या स्वाभिमानाला नक्कीच ठेच पोहोचवणारी असते. 

नोकरी सोड सांगणं सोपं आहे पण ती मिळवण्यासाठी खेटे घालणं आणि धडपड करणं कठीण आहे. मला वाटतं सप्तपदीमध्ये आणखी काही वचनं द्यायला हवीत.जी फार गरजेची आहे. 

शेवटी समाज काय म्हणेल इथे सगळं अडतं हो. पण समाजातील लोक कधीच गरजेला तुमच्या मदतीला येत नाहीत. ना जातीतले. अहो इथे रक्ताचे लोक हात झाडायला कमी करत नाहीत. 

आपली जबाबदारी कशी संपेल याकडे लक्ष लावून असतात. शेवटी कामी येतात ती आपण आपल्या स्वभावातून जपलेली नातीच. तिथे कास्टचं किंवा समाजाचं बंधन नसतं पण तिथे नक्की आपुलकी असते. 

अडल्या नडल्या प्रसंगाला उभं राहण्याची ताकद असते. समजातील बोजाखाली आपण पुन्हा मागे जात आहोत. फक्त जबाबदारी संपवायची म्हणून एकदा लग्न उरकून मोकळे होत आहोत. 

मग पटलं तर ठिक नाही तर पटवून घ्या. नाहीतर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होतात ती वेगळी त्याला कारण आणि कंगोरेही वेगळे आहेत. 

पटत नाही म्हणजे काय शारीरिक भूक भागवण्यासाठी काही आपला रस्ता वेगळा निवडतात तर काही मानसिक गरज भागवण्यासाठी त्यामध्ये कोणीतरी एक फसतं तर कुणाचं तरी फावतं. नाहीतर आज आजूबाजूला एवढ्या बातम्या आणि घटना पाहायला मिळाल्या नसल्या. 

आता इथे संस्कार हा मुद्दा आणू नका. कारण मुळातच ते पितृसत्ताक पद्धतीनं वडिलांचा आणि थोरामोठ्यांच्या धाकातले संस्कार असतात. जिथे आईला स्वातंत्र्य कमी आणि वडिलांना जास्त असतं. त्यामुळे संस्कार नाहीत वगैरे या गोष्टी गौण आहेत. त्यासाठी आपले विचार बदलणं हाच एक मार्ग आहे.

आता मला पडलेले काही प्रश्न


लग्न का करावं? 

- जोडीदार मिळावा म्हणून आयुष्यभर साथ देणारा हवा म्हणून? मग तिथे वरील सगळ्या मुद्द्याचं काय?

- यामध्ये नकारात्मक भूमिका माझी नाहीय पण शिफ्ट ड्युटी किंवा नोकरीत काम करणाऱ्या मुलींना नोकरी सोडणं हा एकच पर्याय आहे का?

- सासूही कधीकाळी सून असते मग निवडलेल्या सूनेबद्दल इतकी इनसिक्युरिटी का? मुलगा बैल होईल, ती घर फोडेल, ती वाईट आहे.....ती गिळून टाकेल ही मानसिकता येते कुठून, मग लग्न करायचंच का? फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी?

- जर लग्न समजून घेणाऱ्या जोडीदाराशी करायचं तर तो निवडायचे निकश काय असायला हवेत? 

- मग समजूदार आणि कर्तुत्ववान मुलगा मिळाल तर जातीचे निकष किती लागू करायचे? मग वाळीत टाकण्याचे प्रकार होणार त्याचं काय?

- कोणतीच जात वाईट नाही कमी नाही किंवा उच्च नाही. प्रत्येकाचं अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. राजकीय मतांसाठी राजकीय दृष्टीनं मतांचं राजकारण होतच राहणार. त्याबद्दल मला आता तरी काही मत मांडायचं नाही पण मग जाती-जातीतील विचारसरणी कशी बदलणार?

- लग्नाची परिभाषा बदलतेय असं वाटतंय का? एक व्य़वसाय, एक फॅशऩ किंवा एक करार किंवा एक मोलकरीण म्हणून घरी आणणं यापैकी एक होतंय का? 

- मुलगा-मुलगी दोघांनी मिळून घर सांभाळलं तर बिघडलं कुठे? भूक तर दोघांनाही लागते मग तिनेच करावं हा अट्टाहास का? घर दोघांचं आहे मग तिनेच जबाबदारी घ्यावी हा हट्ट का? 

मी अजूनतरी या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरं शोधते आहे. माझ्या सोबतच्या मुलींची लग्न होत आहेत त्यांना एक एक वर्षांची मुलं आहेत. पण मला अजूनही हा प्रश्न त्रास देतोय लग्न करायचं तर का? नुसतं कुटुंब वाढवण्यासाठी? जबाबदारी संपवण्यासाठी? आपलं माणूस शोधण्यासाठी? की आणखी काही....

का नुसतं कुटुंब वाढवायचं आणि जबाबदारीतून हात झटकून इतरांसारखं पटपट बाहेर पडायचं म्हणून हे सगळं करायचं की खरंच आपला जोडीदार निवडायचा आणि आपलं माणूस शोधायचं म्हणून करायचं? तुमच्याकडे याचं उत्तर असेल तर नक्की मला सांगा. 

धन्यवाद!

Monday 31 August 2020

एक चूक...

          कुकरची शिट्टी वाजली तशी ती दचकली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपण सपशेल फसवले गेले आहोत याची जाणीव तिला झाली. प्रेमातून झालेली फसवणूक की आपला आंधळा विश्वास म्हणून आपण हा निर्णय घेतला या प्रश्नात ती अजूनही अडकून पडली होती. पण आता मागे फिरण्याचा कोणताच पर्याय तिच्याकडे उरला नव्हता. एकतर एकट्यानं जगायचं किंवा आहे ते मुकाट्यानं सहन करत प्रेमात मिळणारे धक्के पचवण्याची ताकद वाढवायची. तिचे डोळे ओघळत होते. काय करावं हे सुचत नव्हतं. लग्नाला अवघे दोन महिने होऊन गेले होते. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यानं माहेर आणि मित्रही तुटले होते. फक्त साहारा होता तो नवऱ्याचा पण तोही दिवसेंदिवस साथ सोडतोय की काय? याची भीती आता मनात घर करू पाहात होती. तुझ्यासाठी सगळं एडजेस्ट करतो म्हणणारा माझा सोहम आता रोज मीच कशी चुकते याचे धडे देत होता. आई त्याचे कान भरत होत्या आणि तो कोणताही न विचार करता बोलत सुटायचा,  लग्नानंतर इतका बदलेल असं जराही वाटलं नव्हतं. 6 वर्षांच्या आमच्या प्रेमात त्यानं असं कधी केलं मात्र. पण या सगळ्याला त्याच्या आईचीच फूस असेल असं कधीही वाटलं नाही मात्र आता समोर येणाऱ्या गोष्टी आंधळ्या प्रेमाची साक्ष देताना आणि रोज थोडं मनाला मारत आहेत. आपण केलेल्या चुकीची शिक्षा देत आहेत. 

   ‘अजून झालं नाहीच का तुझं. कासवाच्या गतीनं काम करते आहे. माझ्या मुलाला खाल्लंस आता या घरातल्या माणसांनाही माझ्याविरोधात नेऊ पाहातेय पण त्यांना काय माहीत ही किती आतल्या गाठीची आहे ते’. सासूबाई मागून जोरात ओरडत होत्या. घरातल्या सगळ्या गोष्टी करून नोकरी करून घरात पैसे देत असताना रोज मुलीऐवजी मोलकरणीसारखी वागणूक मिळत होती. यावर हळूहळू आता माझ्यात आणि सोहममध्ये वाद होऊ लागेल होते. 

    आज मात्र मी मनाशी पक्क केलं, आज काय वाटेल ते झालं तरी प्रत्येक गोष्टीचा जाब मात्र सोहमला विचारायचा. सोहम त्याचं काम आटपून संध्याकाळी घरी आला होता. कामाचा ताण जास्त होता का? कसा गेला दिवस? मी पाण्याचा ग्लास पुढे करत त्याला विचारलं. त्यांनं उत्तर देणं टाळलं आणि खोलीत निघून गेला. मला वाईट वाटलं कारण एकमेव सपोर्ट करणारा सोहमही आता माझ्यासोबत फटकून वागत होता. रात्री सगळेजण जेवायला बसलो. आज मी पहिल्यांदाच शेपूची भाजी केली होती. मी केलेल्या भाजीत हलकी हळद टाकली म्हणून सासूबाईंनी ती भाजी रागानं खाल्लीच नाही. नाकं मुरडत त्यावर चार नावं ठेवून मोकळ्या झाल्या. मी सोहमकडे पाहिलं. तो जेवणात मग्न होता. त्याला काही कशाचं मुळी पडलेलं नाही. मी मुकाट्यानं एकच पोळी खाऊन उठले सर्वांची जेवणं आटपली आणि सगळं आवरून खोलीत आले. सोहम आपल्या फोनमध्ये बिझी होता.

सोहम मला तुझ्यासोबत बोलायचं आहे.- मी

हा काय गं बोल ना लक्ष आहे माझं- सोहम

असं नाही, मला खरंच काहीतरी सांगायचं आहे- मी

मी दमलोय आणि तू तेच तेच सांगणार जे मी गेले कित्येक दिवस ऐकतोय आणि तुझी समजूत काढतोय- सोहम

अरे पण आपलं एकमेकांवर प्रेम आहे. तू मला साथ देणं आपेक्षित आहे. तू लग्नाआधी तसं मला तसं प्रॉमिस केलं होतं.- मी

हो की मी कुठे साथ सोडली आणि माझ्या आईला काम लागलेलं मला आवडणार नाही हे मी तुला लग्नाआधीही बोललो होतो.- सोहम

    ऐक ना पण मी सगळं करून घर सांभाळते. माझी त्याबद्दल तक्रार नाही पण आईंनी समजून घ्यायला हवं ना थोडं. त्याही या स्टेजला होत्याच ना कधीतरी- मी

इतर मुली करतात मग तुला का नाही जमत, उगाच काम करायचं नाही म्हणून कारण देऊ नको आणि माझं डोकं फिरवू नको. आई तुला तुझ्या चांगल्यासाठीच बोलते.- सोहम

अरे हो पण किती? जाता येताना घालून पाडून बोलत असतात. तूही त्यांची बाजू घेतोस. लग्न करून मी चूक केली का? लग्नाआधीच सगळं तोडलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे- मी

    काय बोलतेय तू. प्रेम आहे आपलं आणि होईल सगळं नीट. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय तू प्लीज असं काही करू नकोस असं म्हणत त्यानं मला जवळ घेतलं आणि कपाळावर किस केलं. त्याला माझं प्रेम हवंय की घरात राबायला मी हवीय असा प्रश्न एक क्षण मनात आला. त्यानं मला कुशीत घेतलं आणि तो मात्र शांत झोपी गेला जसं काही घरात घडतंच नाही असं. मी मात्र मनातल्या विचारांनी अस्वस्थ होते. पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत होते.

- क्रांती रवींद्र कानेटकर

Saturday 8 August 2020

रवींद्रनाथ टागोरांच्या कथा आणि मी...

आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं खास...
रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही कथांचा भाग नेटफ्लिक्सवर पाहिला. 26 कथा इतक्या सुंदर एकमेकांमध्ये गुंफल्या आहेत की त्याची लिंक कुठेही तुटत नाही. म्हणायला गेलं तर त्यातली प्रत्येक कथा वेगळी असली तरीही ती एकमेकांशी संलग्न आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पत्रांमध्ये गोष्ट सुरू होते स्त्रीपासून आणि संपतेही तिथेच. 
पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या असणाऱ्या समस्या आणि बदलू सगळ्या जाचातून मुक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीपर्यंतची त्यांनी बदलती मांडलेली भूमिका खूप सुंदर आहे. अगदी राजकारणापासून ते प्रेमापर्यंत आणि घरातली कर्तव्य बजवण्यापासून ते काम करण्यापर्यंत स्त्रीची वेगवेगळी रुप आणि प्रत्येक भूमिका आपल्या मनात घर करून जाते. आजही जसंच्या तसं अगदी घडत नसलं तरी त्या कथा कुठेतरी मनाला आपल्या अगदी आजही जवळच्या वाटतात. 
चोखेर बालीमधली सर्वगुणसंपन्न असूनही नाकारली जाणारी चोखेर जेव्हा राजकारण करून बालीच्या पतीला जिंकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती आजही मला भावते. तितकीच आवडते राग नाही येत पण तिच्याबद्दल मनाचा एक कोपरा हळवा होतो. 
कबुलीवाला मधली छोटी मुलगी मीनाही तितकीच मनाला भावते. लहानपणी स्वत:चं म्हणणं खरं करणारी मीना मात्र लग्नानंतर नवऱ्याचं सगळं ऐकते आणि केवळ गप्प बसल्यानं तिचा कसा बळी जातो. तेव्हाच्या काळी स्त्रियांना असणारं महत्त्व आणि स्वतंत्र्य या दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे या कथांमध्ये सांगितल्या आहेत. बस तूम कुछ बोलना मत चूप रहेना...मी सगळं ठिक करेन असं म्हणणारा मीनाचा पतीच भावाला वाचवण्यासाठी बेकसूर असणाऱ्या मीनाला फासावर लटकवतो तेव्हा मात्र आपल्यालाच संताप येतो. ही मीना आजही मला तितकीच जवळची वाटते. कारण आजही परिस्थिती आणि गोष्टी बदलल्या तरीही गुन्हे करणारे मोकाट सुटतात आणि चूक नसणारे मात्र कायमचेच लटकतात.
बदलू पाहणारी आणि पंख पसरून उडणारी दो बहेन मधली अर्मिला जेव्हा तिच्याच बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडते आणि तिची चूक समजल्यावर ती माफी मागून निघून जाते पण बहिणीचा संसार माडू देत नाही. प्रेमाचा त्याग आणि चुकीची शिक्षा... स्वत:चं लग्न मोडलं तरी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चिछ्छी लिहून ती मुंबईला निघून जाते.  
मृणाल की प्रतिमा...या कथेत नवऱ्यासाठी वेळ नाही आणि घरातही सगळं करून स्वत:साठी वेगळी वाट शोधणारी मृणाल पाहायला मिळते. तर अपरिचिता कथेमध्ये स्वाभिमानानं जगणारी स्त्री रेखाटली आहे. 
एकूणच 26 कथांमध्ये त्याकाळी समाजात आणि घरात असणाऱ्या स्त्रीयांचं स्थान आणि बदलू पाहणारी स्त्री. तिच्या भोवतालच्या समस्या आणि त्यातही ती स्वत: नवऱ्याचा आणि घराचा आधार बनून आपलं वेगळेपण निर्माण करण्यासाठी धडपडणारी स्त्री पाहायला मिळते. या कथांमध्ये प्रेम, मायेचा ओलावा आणि त्यावेळच्या असणाऱ्या परंपरा अगदी अधोरेखित करत छान मांडल्या आहेत.
यातली प्रत्येक कथा आताच्या काळात रिलेट करावी अशी वाटते. मनोरंजनासोबतच त्या काळी असणारी परिस्थिती आणि त्यातही स्त्रीचं स्थान...बदलू पाहणारी ती...अधोरेखित होते...
त्यातला एक संवाद मनाला चटका लावून जातो मला मुलगी पत्नी दुसरी मिळेल पण भाऊ नही किंवा स्त्रीनं घरातल्या कामांमध्ये मन रमवावं लेखाजोखा करण्यात नाही. अशा अनेक प्रसंगांमधून तेव्हा असणारी मानसिकता ही आजही काहीप्रमाणात असल्याचं आपल्याला भासत राहातं. एकूणच या कथा मनोरंजन तर करतात पण त्यासोबत तितक्याच आजच्या काळातही जिवंत वाटतात आणि हेच रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनाच वैशिष्ट्यं आहे. 
- क्रांती कानेटकर
7 ऑगस्ट 2020

Monday 15 June 2020

#marriage story : काकांच, 'का...कू...' प्रेम, अजब प्रेमाची गजब कहाणी...


      नवरा माझं कौतुक करत नाही आणि त्याचं माझ्यावर प्रेमच नाही ही प्रत्येक स्त्रीची ही तक्रार असते. आपल्याला दिसतं आणि वाटतं तसं नसतं, हे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही. अगदी नवविवाहितांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्यात एक वेगळं प्रेम असतंच. कधी ते व्यक्त केलं जातं, तर कधी न व्यक्त होताही. वर्ष जशी सरतात तशी त्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते आणि प्रेमही अबोल होतं. मात्र तरीही नवरा कौतुक करत नाही हा पाढा मात्र कायम सुरूच असतो. 
    नवरा कौतुक करत नाही आणि त्यांचं प्रेमच नाही अशी सतत कुरकुर करणाऱ्या 70 वर्षांच्या काकूंवर काकांचं मात्र खूप जास्त प्रेम आहे. बऱ्याचदा काकूंना मात्र ते प्रत्यक्षात दिसत नसल्यानं किंवा काकांनी बोलून व्यक्त न केल्यानं गेल्या 40 वर्षांपासूनची काकूंची कुरकुर सुरू आहे. ही कुरकुर काका मात्र अगदी मिश्कीलपणे घेत तिच्यावर अपार प्रेम करतात. त्यांच्यातील या अबोल प्रेमाची ही छोटीशी कथा शब्दात मांडण्याचा प्रयत्न.
     काका तसे खूप शांत, अगदी मोजकं आणि कामापुरतं बोलणारे. काकू मात्र त्याच्या अगदी बरोबर उलट्या स्वभावाच्या. सतत बोलून व्यक्त व्हायचं जे मनात आहे ते सांगून मोकळं होणाऱ्या. नवरा आपलं कौतुक करत नाही आणि आपल्यावर प्रेम नाही कायमच ते फक्त कामापुरतं बोलतात. बाकी त्यांना काही पडलेलं नसतं काकूंची कायम तक्रार असते. रोज दोघांनीही संध्याकाळी 4.30 वाजता एकत्र बसून चहा प्यायची त्यांची नियमित सवय. काम करून जास्त दमल्यामुळे सहज त्यांना पडल्यापडल्या झोप लागली. काका मात्र चहाच्या वेळेनुसार उठले. पाहिलं तर शांत झोपल्या होत्या. त्यांना पाहून काकांनी हळूच पडदा ओढून घेतला. 
      मला खाली दूध आणायला जायचं होतं. मी काकांना सांगून दूध आणायला निघाले. त्यावेळी काका हळूच म्हणाले, 'बेल वाजवू नको हा! काकू झोपली आहे; दारावर टकटक कर, मी दार उघडेन.' मी फक्त हसून दूध आणायला निघून गेले. मी दूध घेऊन घरी आल्यावर दारावर टकटक केलं तर काका खरंच दाराजवळ उभे होते. त्यांनी शांतपणे दार उघडलं आणि निघून गेले. काकूंची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी मला दाराची बेल वाजवू नको असं सांगितलं होतं. चहाची वेळ उलटून गेली असतानाही त्यांनी उठवलं नाही. काकांचं न बोलताही काकूंवर असणारं हे अबोल प्रेम त्यादिवशी मला जाणवलं आणि खूप अप्रूपही वाटलं. 
     दुसरा सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही काकांना घरी कायम काकूंनी जेवण वाढायला हवं असा हट्ट असायचा. अन्नपूर्णा असलेल्या आपल्या बायकोने जेवण वाढल्याशिवाय गळ्याखाली काही घास उतरायचा नाही. जेवण तयार असेल आणि काकूंनी वाढलं नाही तर ते हातानी घेत नाहीत. काकूची वाट पाहतात किंवा दूध ब्रेड खातात. पण तिने जेवण आपल्या हातानं वाढून द्यावं हा हट्ट मात्र त्यांचा आजही कायम आहे.
    खरंच, आपल्याला बोलणाऱ्या किंवा व्यक्त होणाऱ्याच्या मनातील भावना, प्रेम दिसतं, कळतं, जाणवतं बोलून मोकळे होतात हे दिसतं. पण जे व्यक्त होत नाही त्यांना समजून घेणं आणि त्यांचे प्रेम कळणं फार कठीण आहे. काका प्रत्येक क्षणाला जरी प्रेम व्यक्त करत नसले तरी काकूंप्रती असलेली काळजी, जिव्हाळा आणि प्रेम हे कित्येकदा त्यांच्या कृतीतून दिसतं. खूप छोट्या गोष्टींचीही ते नकळत काळजी घेतात त्यात कुठेही दिखावा नसतो. 100 गिफ्ट, प्रेमाचे केवळ दोन शब्द आणि खोटी स्तुती करण्यापेक्षा त्यांनी अबोल पण चिरंतर असं हे प्रेम आपल्या मनात आणि कृतीत जपलं आहे. 40 वर्ष लग्नाला उटल्यानंतरही आज काकू कितीही कुरकुर करत असल्या तरीही ते कोणतीही तक्रार करत नाहीत. या उलट ते मिश्कीलपणे घेत तू बरोबर आहेस असं म्हणून तिचं मन राखण्याचा कायम प्रयत्न काका करतात.
क्रांती कानेटकर
-दिनांक- 15 मे 2020, मुंबई

Sunday 14 June 2020

संवाद संपला की वाद होतो? पण बोलायला खरंच वेळ आहे का? लॉकडाऊनमधला माझा अनुभव


प्रातिनिधिक फोटो

          काम करत असताना रविवारी (14 जून ) अचानक ट्वीट दिसलं. सुशांत सिंह राजपूतनं गळफास घेऊन आत्महत्या केली. एम. एस. धोनी हा मी पाहिलेला त्याचा चित्रपट. त्याच्या आत्महत्येबाबत आधी वाचून विश्वास बसेना, बातमी कन्फर्म आहे का हे पाहण्यासाठी इतर वेबसाईटवर शोधाशोध सुरू झाली आणि काही सेकंदात ही बातमी खरी ठरली. सगळ्यांनाच अचानक आलेल्या या बातमीनं मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो आणि कोट्स पुढच्या काही सेकंदात व्हायरल होऊ लागले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता सुशांतसोबत असं नेमकं काय घडलं असावं की त्याला आयुष्य संपवण्याची वेळ आली? दुसरं म्हणजे त्याचं मन मोकळं करायला खरंच हक्काची व्यक्ती नव्हती का की त्याला असा निर्णय घ्यावा लागला? य़ा प्रश्नांनंतर  सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरायला लागल्या आत्महत्या ही पळवाट आहे मनातल्या गोष्टी शेअर करायला हव्यात. बोलायला हवं... सगळं खरं असलं तरी माझ्या मनात आलेला सर्वात पहिला प्रश्न होता कुणाशी बोलायचं?
       स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपल्या व्यापात व्यस्त आहे. प्रत्येकाला या स्पर्धेत टिकायचं आणि जिंकायचं आहे. मोबाईल, टीव्ही, वेबसीरिज, ऑनलाइन खेळ आणि कामाचं शेड्युल या सगळ्यात हरवला आहे तो संवाद. हा संवाद कुणाशी आणि कसा साधायचा हाच मोठा प्रश्न आहे. ज्याला हे सगळं सांगावं ती व्यक्ती किती गोपनीयता बाळगेल? त्याचा गैरफायदा घेणार नाही ना? आपलं म्हणणं ऐकायला आणि समजायला त्याच्याकडे वेळ तरी आहे का? असे अनेक प्रश्न आजच्या या घटनेनंतर अधिक जास्त मला पडायला लागले.
हे प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण होतं ते म्हणजे लॉकडाऊनमध्ये माझं असलेलं एकटेपण. तुम्ही कितीही बतावण्या केल्यात तरी व्हर्च्युअल जगाचा एका लिमिटनंतर कंटाळा येतो. किमान मला तरी खूप त्रास व्हायला लागला. लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरापासून कित्येक किलोमीटर लांब एकटं राहायचं, जिथे बोलायला आणि भेटायला लॉकडाऊनमध्ये कुणी येऊ शकतं नाही. प्रत्येक जण आपल्या व्यापात किंवा गॉसिप करण्यात व्यस्त असतो. कुणाला फोन करून बोलायची आणि वेळ मागायचीही चोरी झाल्यासारखं वाटलं मला.
       गमतीचा मुद्दा असा की लॉकडाऊनआधीही असे किती आणि कुठे कुणी बोलायचे कारण जो तो मोबाईल आणि आपल्या व्हर्च्युअल जगात किंवा कामात बिझी असायचा. यावरून मित्र-मैत्रीणींसोबत अनेक वादही झाले पण संवाद काही होऊ शकला नाही. प्रत्येकनं सुचवलं वेबसीरिज पाहा, वाच, लिही किंवा सिनेमा बघ काहीच नाही तर झोप काढ. पण हे त्या सगळ्यांसाठी फार सोपं होतं असं वाटायला लागलं होतं; कारण ते घरात कुटुंबात राहात असल्यानं त्यांच्या भोवती माणसं होती. सलग 3 महिने एका खोलीत मोबाईल, लॅपटॉप आणि तुम्ही एवढंच राहिलं तर एका वेळेनंतर जे फ्रस्ट्रेशन येईल तशी माझीही चिडचिड पहिल्या महिन्यात वाढायला लागली होती. सतत माणसात राहाणं आणि बोलण्याची सवय असल्यानं एकटं राहण्याचा हा अनुभव फार वेगळा आणि सुरुवातील खूप त्रासदायक होता. आता मात्र हळूहळू या वातावरणाची सवय व्हायला लागली. राहून राहून आता मलाच माणसं किंवा होणारा संवाद हा फक्त कामापुरता व्हावा असं वाटू लागेल अशी भीती मनात यायला लागली. काहींना ही नक्कीच नकारात्मकता वाटेल पण एका लिमिटनंतर डोकं भणभणायला लागतं हे पण तितकंच खरं आहे. 
     आपल्याला लहानपणापासून माणसात राहण्याची किंवा सतत कोणीतरी सोबत असण्याची एक सवय झालेली असल्यानं हा एकटेपणा खायला उठतो. कितीही व्हर्च्युअल जग मोठं आणि चांगलं वाटत असलं तरीही आपल्या माणसांसोबत होणारा संवाद हा त्यापेक्षा जास्त आनंद देणार असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या स्वार्थी वृत्ती आणि आत्मकेंद्रीपणामुळे नात्यातील संवाद संपून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळालं. ब्रेकअप पासून ते घटस्फोटापर्यंतचं प्रमाण आणि लग्नानंतर केवळ नवऱ्याकडून प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर होणारे प्रेम प्रसंग ह्या गोष्टींचं प्रमाण कुठेतरी वाढतंय असं ब्लॉग, बातम्यांमध्ये वाचनात आलं. नात्यातला वाद आणि वाढणारं अंतर यामुळे आपण जवळपास अर्ध मशीन झालोच आहोत. येत्या काळात पूर्ण मशीन होऊ अशी भीती वाटायला लागली आहे. यामधून वाढणारा आत्मकेंद्रीपणा, प्रॅक्टीकलच्या विचारांच्या नावे आपण करत असलेल्या कृतीनं नात्यातील संवादाचा गळा घोटत आहोतच पण वादाला मात्र जागा करून देत आहोत.
      मन हलकं करण्यासाठी, नात्यातील प्रेम वाढावं, प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुटावेत म्हणून इथपासून ते अडीअडचणींना एकमेकांच्या पाठिशी उभं राहाता यावं म्हणून एकमेकांसोबत मनमोकळेपणानं संवाद साधायचा असतो. त्यातून घर, मित्र परिवार, आपली नाती तयार होतात. पण याच संवादाचा कुणीही गैरफायदा घेऊ नये किंवा गैरवापर करू नये ही एक धास्ती मनात असते. व्हर्च्युअल जगात ते ऐकायला कुणी नाही म्हणून कित्येकदा गोष्टी शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या तरी दोन गोष्टींची आतातरी गरज आहे असं मला वाटतं. जी आपल्या पातळीवर करता येईल. एकतर आपण इतकं एकटं राहायला शिकायला हवं की सगळं झेलायची ताकद हवी. आपल्याला कुणाचीही गरज पडणार नाही याची ठाम स्वत:च्या मनाला शाश्वती द्यायला हवी. थोडक्यात आपणच आरशासमोर आपलं शिल्पकार व्हायचं. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्या कामातून म्हणजेच दिवसातल्या 24 तासांतून किमान काही मिनिटं महत्त्वाच्या नात्यांसाठी वेळ देणं आणि संवाद साधणं... नाहीतर शरीरानं नाही पण मनानं मात्र अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ काही दूर नाही असं मला वाटतं...
- क्रांती कानेटकर
- दिनांक- 15 जून 2020, मुंबई

Thursday 26 March 2020

#21Days: कोरोनाने कुछ तो करना सिखा दिया, पण काळजी घ्या



कोरोना, चीन, भारत, जनता कर्फ्यू, लॉकडाउन, कोरोना रुग्ण हेच शब्द गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकं घरातच बंद झाली. अत्यावश्यक गोष्टी वगळता बाकी सर्व सेवा बंद राहणार असं सांगितलं. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसंच नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लॉकडाउन झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत आलेला अनुभव विसरता येणार नाही असाच आहे. प्रत्येकाला असे काही ना काही अनुभव आलेच असतील. कोणी प्रवास करताना अडकलं असेल. गाड्या मिळाल्या नसतील किंवा इतर अनेक अडचणी आल्या असतील.

माझाही अनुभव त्यापेक्षा काही वेगळा नाही. एका अशा शहरात जिथं एकटं राहताना सगळं बाहेरून घ्यावं लागतं. तिथं अचानक लॉकडाउन केलं जातं तेव्हा एकाच वेळी अनेक प्रश्न समोर उभे राहतात. ते प्रश्न सोडवताना जी काही तारांबळ उडते त्याचा अनुभव घेतला.  आपण सुरू केलेल्या डब्ब्याची सेवा बंद होते. जेवण स्वत: करून खाणं म्हणजे काय हे माहितीच नसल्यानं शिजवण्याचा प्रश्नच नसतो. त्यातच वर्क फ्रॉम होम ते सांभाळायचं असतं. आपल्या कामाच्या वेळेनंतर बाकीच्या गोष्टी करताना गोंधळ उडतो. आदल्या दिवशी आपल्याकडं काही असण्याचा तसा संबंध नाही. रोज लागेल ते थोडं घेऊन यायचं आणि वापरायचं असाच दिनक्रम. त्यामुळे लॉकडाउन झाल्यानंतर साहित्य आणायचं कुठुन असा प्रश्न. बरं बाहेर जावं तर सर्व दुकानं आधीच बंद झालेली असतात. त्यामुळे खाण्याचे पूर्ण वांदे आणि टीव्हीवर सांगितलं जात आहे किराणा मालाची दुकानं उघडी आहेत. बस फक्त चिडचिड होते. कारण आपल्याकडे शिल्लक नाही आणि खरेदी करायला काही सुरू नाही. काहीच नाही तर शोधू मिळालं तर ठीक नाही तर उपवास घडणारच म्हणून थोडं अंतर चालत शोधमोहिम सुरू केली. तेव्हा एक पेरूवाला आणि दूधाची डेअरी चालू उघडलेली दिसली.  दूध घेऊन रुमवर आले. त्यादिवशी दूध आणि पेरू एवढ्यावरच भागवावं लागलं. तो दिवस ढकलावाच लागला. काही पर्यायच नव्हता. सुदैवानं बिस्कीटं आणि मूग होते. बिस्किटं कॉफिसोबत खाल्ली आणि मूग भिजत घालून खाल्ले. पण हे किती पुरणार होतं. त्यातही उद्यासाठी काय मिळेल का याची शंका त्यामुळं थोडं शिल्लक ठेवावं लागलं. उद्या काय मिळेल आणि कसं याचा प्रश्न आ वासून समोर होता. कसाबसा पहिला दिवस गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला उशीर झाला होता. मोदींनी केलेल्या घोषणेनंतर सकाळी 8 ते 10 दुकानं उघडी राहणार होती. धावत पळतच बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर पाकिट उघडलं तर तिथंही ठणठणाट. तर अडचणींना सुरुवात झालेली. आता त्यात एटीएम होतं पण पैसे काढायला लागणारं एटीएम मशिन बंद होती. जवळ असलेली 5 एटीएम मशिन पण त्यात खडखडाट. झालं आता आणखी एक पर्याय शोधा. एक समस्या सोडवताना दुसरी समस्या समोर तयार होती. नवीन भाग असल्यानं त्याबद्दलची माहितीही नव्हती. कुठे काय मिळेल हे शोधावं लागणार होतं. लॉकडाउनमुळे विचारायला रस्त्यावरही इकडं तिकडं कोणी नव्हतं. उशिर झालेला आणि 10 वाजायला काहीच मिनिटं होती. त्याच वेळेत एटीएममधून पैसे काढावे लागणार होते. कारण दुकानंही बंद होण्याची शक्यता होती. त्यानंतर संध्याकाळी उघडतील की नाही माहीत नाही. पुन्हा सामान संपलं तर काय? भीतीनेच पोटात गोळा आला.  जवळपास एक-दीड किलोमीटर चालल्यानंतर रांग लागलेलं एटीएम दिसलं. हुश्श म्हणत सुस्कारा सोडला. रांगेत उभी राहिले. सुदैवानं रांग लवकर संपली आणि थोडे ज्यादाचेच पैसे काढून मी आनंदान बाहेर पडले.

पैसे काढले आता त्या पैशातून जे साहित्य खरेदी करायचं होतं त्याचं दुकानं शोधण्याची वेळ होती. सगळं बंद असताना आणि पोटात कावळे ओरडत असताना स्वस्त आणि महाग हा विचार करण्यापेक्षा जे मिळेल जसं मिळेल ते घ्यावं लागत होतं.  दुकानदारही चढ्या भावानं विकत होते. माल येत नाही ताई घ्यायचं तर घ्या नाहीतर राहुदे अशा भाषेत सांगत होते. नाईलाज होता. शेवटी एका दुकानातून तांदूळ आणि मूगडाळ घेतली. बाकी काकडी, कांदा, टोमाटोसोबत इतर खायला घेतलं आणि निघाले. आयुष्यात पहिल्यांदा जेवण शिजवण्याचा प्रयत्न केला. आई-वडील सोबत नसताना फक्त मित्र-मैत्रिणी आणि ऑफिसरचे सहकाऱ्यांसोबत संपर्कात राहून फोनवरून विचारलं. आणि पहिल्यांदाच घाबरत इंडक्शनवर खिचडी केली. नशीबानं पहिलाच प्रयोग चांगला झाला.  हॉस्टेलवर राहिल्यानं याआधी कधीही जेवण करायची वेळ आली नव्हती. आज पहिल्यांदा ती वेळ आली.
अनेकांनी चिडवलं देखील या लॉकडाऊनमध्ये बघ जेवण शिकायची ही संधी आहे. म्हणजे लग्नानंतर तुला त्रास होणार नाही. पण लग्नासाठी नाही तर स्वत:ला जगण्यासाठी काही गोष्टी आल्याचं पाहिजेत हे मात्र खरं आहे. त्यातही पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानं आता थोडा धीर आला. त्यामुळे असे प्रयोग  आता पुढचे 21 दिवस करायला हरकत नाही हा विचार आला. या लॉकडाऊनमुळे का होईना पण काय आणि कशा समस्या येतील हे समजलं. प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार आधीच करायला हवा. बॅकअप हवा आणि आईची आठवण झाली.
बाकी अशा अनेक गोष्टी आणि अडचणी येतील आणि उरलेल्या दिवसांमध्ये  आणखीही बरंच काही शिकायला मिळेल. तुम्हीही विनाकारण बाहेर जाऊ नका आणि गेलात तर मास्क घाला आल्यावर स्वच्छतेची काळजी घ्या. घरी रहाल तर सुरक्षित रहाल.