Saturday 8 August 2020

रवींद्रनाथ टागोरांच्या कथा आणि मी...

आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं खास...
रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही कथांचा भाग नेटफ्लिक्सवर पाहिला. 26 कथा इतक्या सुंदर एकमेकांमध्ये गुंफल्या आहेत की त्याची लिंक कुठेही तुटत नाही. म्हणायला गेलं तर त्यातली प्रत्येक कथा वेगळी असली तरीही ती एकमेकांशी संलग्न आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पत्रांमध्ये गोष्ट सुरू होते स्त्रीपासून आणि संपतेही तिथेच. 
पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या असणाऱ्या समस्या आणि बदलू सगळ्या जाचातून मुक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीपर्यंतची त्यांनी बदलती मांडलेली भूमिका खूप सुंदर आहे. अगदी राजकारणापासून ते प्रेमापर्यंत आणि घरातली कर्तव्य बजवण्यापासून ते काम करण्यापर्यंत स्त्रीची वेगवेगळी रुप आणि प्रत्येक भूमिका आपल्या मनात घर करून जाते. आजही जसंच्या तसं अगदी घडत नसलं तरी त्या कथा कुठेतरी मनाला आपल्या अगदी आजही जवळच्या वाटतात. 
चोखेर बालीमधली सर्वगुणसंपन्न असूनही नाकारली जाणारी चोखेर जेव्हा राजकारण करून बालीच्या पतीला जिंकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती आजही मला भावते. तितकीच आवडते राग नाही येत पण तिच्याबद्दल मनाचा एक कोपरा हळवा होतो. 
कबुलीवाला मधली छोटी मुलगी मीनाही तितकीच मनाला भावते. लहानपणी स्वत:चं म्हणणं खरं करणारी मीना मात्र लग्नानंतर नवऱ्याचं सगळं ऐकते आणि केवळ गप्प बसल्यानं तिचा कसा बळी जातो. तेव्हाच्या काळी स्त्रियांना असणारं महत्त्व आणि स्वतंत्र्य या दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे या कथांमध्ये सांगितल्या आहेत. बस तूम कुछ बोलना मत चूप रहेना...मी सगळं ठिक करेन असं म्हणणारा मीनाचा पतीच भावाला वाचवण्यासाठी बेकसूर असणाऱ्या मीनाला फासावर लटकवतो तेव्हा मात्र आपल्यालाच संताप येतो. ही मीना आजही मला तितकीच जवळची वाटते. कारण आजही परिस्थिती आणि गोष्टी बदलल्या तरीही गुन्हे करणारे मोकाट सुटतात आणि चूक नसणारे मात्र कायमचेच लटकतात.
बदलू पाहणारी आणि पंख पसरून उडणारी दो बहेन मधली अर्मिला जेव्हा तिच्याच बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडते आणि तिची चूक समजल्यावर ती माफी मागून निघून जाते पण बहिणीचा संसार माडू देत नाही. प्रेमाचा त्याग आणि चुकीची शिक्षा... स्वत:चं लग्न मोडलं तरी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चिछ्छी लिहून ती मुंबईला निघून जाते.  
मृणाल की प्रतिमा...या कथेत नवऱ्यासाठी वेळ नाही आणि घरातही सगळं करून स्वत:साठी वेगळी वाट शोधणारी मृणाल पाहायला मिळते. तर अपरिचिता कथेमध्ये स्वाभिमानानं जगणारी स्त्री रेखाटली आहे. 
एकूणच 26 कथांमध्ये त्याकाळी समाजात आणि घरात असणाऱ्या स्त्रीयांचं स्थान आणि बदलू पाहणारी स्त्री. तिच्या भोवतालच्या समस्या आणि त्यातही ती स्वत: नवऱ्याचा आणि घराचा आधार बनून आपलं वेगळेपण निर्माण करण्यासाठी धडपडणारी स्त्री पाहायला मिळते. या कथांमध्ये प्रेम, मायेचा ओलावा आणि त्यावेळच्या असणाऱ्या परंपरा अगदी अधोरेखित करत छान मांडल्या आहेत.
यातली प्रत्येक कथा आताच्या काळात रिलेट करावी अशी वाटते. मनोरंजनासोबतच त्या काळी असणारी परिस्थिती आणि त्यातही स्त्रीचं स्थान...बदलू पाहणारी ती...अधोरेखित होते...
त्यातला एक संवाद मनाला चटका लावून जातो मला मुलगी पत्नी दुसरी मिळेल पण भाऊ नही किंवा स्त्रीनं घरातल्या कामांमध्ये मन रमवावं लेखाजोखा करण्यात नाही. अशा अनेक प्रसंगांमधून तेव्हा असणारी मानसिकता ही आजही काहीप्रमाणात असल्याचं आपल्याला भासत राहातं. एकूणच या कथा मनोरंजन तर करतात पण त्यासोबत तितक्याच आजच्या काळातही जिवंत वाटतात आणि हेच रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनाच वैशिष्ट्यं आहे. 
- क्रांती कानेटकर
7 ऑगस्ट 2020