शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

'दृश्यम 2' एक रहस्य तुम्हा आम्हा सगळ्यांना उलगडलं पण 'त्यांना' नाही

 



बऱ्यापैकी आताचे आलेले सिक्वेल हे निराशाजनकच आहेत असं वाटत होतं. मात्र दृश्यम 2 ने हा दृष्टीकोन बदलला. पहिल्या भागापेक्षाही अति उत्सुकता ताणून ठेवणारा हा सिनेमा आहे. तुम्ही अगदी पहिल्या सीनपासून प्रत्येक क्षण तितक्याच उत्सुकतेनं पाहता. 7 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना सतत आपल्या डोळ्यासमोर येत राहतात. पोलीसही केस पुन्हा ओपन करतात पहिल्या भागाप्रमाणेच पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागत नाही. 

एक सीन असा येतो की वाटतं सगळं संपलं आता सत्य समोर येणार आणि विजय सालगावकर तुरुंगात जाणार. मात्र लेखक आणि दिग्दर्शकाने अशी काही जादू केली आपणही चाट पडतो. ही तर सुरुवात आहे, अजून बरंच बाकी आहे. 

दृश्यमचा पहिला भाग जेवढा सरळ होता त्यापेक्षा दृश्यम 2 जास्त इंटरेस्टिंग आहे. घी सीधी उंगलीसे ना निकाले तो टेढी करनी पडती है. त्याच प्रमाणे पोलीस पुन्हा तीच 7 वर्षांपूर्वीची केस ओपन करतात पण शेवटपर्यंत त्यांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नाही.

विजय सालगावकर म्हणजेच अजय देवगणने एक सामान्य नागरिक असून खूप परफेक्ट प्लॅनिंग करून या गोष्टी केलेल्या असतात. त्याने होणाऱ्या परिणामांचाही विचार केलेला असतो. 

तीन सीन असे आहेत जेव्हा असं वाटतं की आता पत्नी सगळं सांगून टाकेल. काही गोष्टी ती नकळत बोलून जाते. त्यातूनही विजय सालगावकर कसं डोकं लावून कुटुंबाला बाहेर काढतो. त्याचं प्लॅनिंगच एवढं जबरदस्त असतं की आपण विचारही करू शकत नाही. इकडची गोष्ट तिकडच्या बोटावर करावी तेवढं अगदी उत्तम पद्धतीने तो या गोष्टी हाताळतो. 

सिनेमात त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे. मी नेहमी मनं आणि बुद्धी यामध्ये माझ्या बुद्धीचं ऐकत आलो आहे आजही तेच करणार. तो शेवटपर्यंत रहस्य आपल्या कुटुंबाकडे उलगडत नाही. साम-दाम-दंड-भेद सगळ्या प्रकाराने पोलीस प्रयत्न करतात. पोलीस हत्या कुणी केली आणि देशमुखांच्या मुलाची हत्या झाली इथपर्यंत म्हणजे सत्यापर्यंत पोहोचतात मात्र त्यांना एकही पुरावा मिळू शकत नाही. तो का मिळू शकत नाही हे पाहाणं जास्त मजेशीर आहे. पुराव्या अभावी पुन्हा एकदा विजय सालगावर या सगळ्यातून सुटतो. 

शेवट तर आणखी भन्नाट आहे. विजय सालगावकर एक स्टोरी लेखकाला सांगतो. त्यावर त्याला सिनेमा काढायचा असतो. ही स्टोरी त्याची स्वत:ची असते असं ती स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला समजतं. पण त्याचा पुढचा क्लायमॅक्स तो लेखकासोबत बसून तयार करतो आणि पुढे कसं ते घडत जातं हे त्यामध्ये दाखवलं आहे. मी या सिनेमाला 10 पैकी 10 स्टार देईन.

का पाहावा दृश्यम 2

- पहिल्या भागापेक्षाही अति उत्सुकता निर्माण करणारा 

- गाण्याचा भडीमार नसलेला

- प्रत्येक क्षण तुम्हाला पुढे काय घडेल याची उत्सकता जागृत करतो

- उत्तम कथा आणि अभिनय यासाठी पाहावा

- सिनेमॅटोग्राफीही उत्तम आणि प्लॉटिंग सुंदर

- प्रत्येक दृश्यं आपल्याला पुढचा सीन पाहायला भाग पाडतात, तुम्ही कुठेच दोन तास बोर होत नाही

दृश्यम सिनेमातून काय शिकायचं?

उत्तम नियोजन आणि दूरदृष्टी

तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या फक्त तुमच्या बुद्धीला पटल्या पाहिजेत

तुम्ही जे ठरवलंय किंवा जे करताय ती कुठेही बोलू नये, त्यामुळे नुकसानच होतं

तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पुढे काय घडेल त्यासाठी तुमचं किती नियोजन आहे याची आधीच कल्पना असायला हवी


क्रांती रविंद्र कानेटकर

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

#marriage story : लग्न का करावं? मला पडलेले काही प्रश्न

लग्न करावं की नाही?
सध्या सोशल मीडियावर किंवा लग्नात एक टोमणा सहज मारला जातो आमच्यावेळी सगळं अॅडजेस्ट झालं. कुठे बिघडलं काही? आजकालच्या मुलींना अक्कल जरा जास्तच आहे नाही का? म्हणून त्यांच्या मागण्या वाढतात. आजकालच्या मुलींना वेळेत लग्न नको असतात. मुलांचं प्लॅनिंग नको असतं. असे एक नाही अनेक बोल सहज लावले जातात. हे बोल लावणाऱ्यांमध्ये महिलाही मागे नाहीत हे विशेष आहे. 

या मुलींना जरा जुळवून घ्यायला नको असतं. प्रत्येक छोट्या गोष्टीला डोक्यावर घेतात. जरा म्हणून अॅडजेस्टमेंट नाही. आमचं सगळं व्यवस्थित झालं कुठे बिघडलं काही.... खरंच कुठे बिघडलं काही... जे बिघडलं ते तुम्हाला पाहाता तरी आलं का? तेवढा डोळसपणा असता तर हा प्रश्न किंवा ही शंका मनात राहिलीच नसती.

मुली जरा शिकल्या, चांगल्या नोकरीला लागल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. आता सगळंच बिघडलं इथे काहीसं... वाटलं ना आश्चर्य. पहिल्यापासून पितृसत्ताक पद्धत असल्याने काही गोष्टी ह्या सहाजिकच समोरच्या मनात खूपत असतात. बोलणारे बोलत असतात. 

ती आपल्यापेक्षा वरचढ होतेच कशी? कमावयला लागली म्हणजे जास्त अक्कल आली का?  हेच मुळाच अनेक ठिकाणी मानसिकता असते. ती उधळी आहे, तिने फक्त घर बघावं, नवऱ्याच्या पोटाला चांगलं चुंकलं खायला करून खायला घालावं, सणवार करावेत आणि त्यानंतर मग नोकरी करून घरात चार पैसे आणले तर तेही घरासाठी खर्च करावेत अर्धे अर्धे. म्हणजे इथे पैसे अर्धे करण्याबाबत समानता असते बरं का? पण घरातली काम वाटून घेण्यामध्ये नाही. का कशासाठी याचं उत्तर नाही. (मुलगा किंवा मुलगी दोन्ही  बाजूनं काहीशी हीच स्थिती आहे)

यालाही काही ठिकाणी नक्कीच अपवाद आहेत नाही असं नाही. पण लग्नाआधी प्रत्येक मुलीला काही गोष्टींचे धडे दिले जातात. बघ सगळं तुला अॅडजेस्ट करून घ्यायचं आहे. वाद झाला तरी आपण गप्प राहावं, जास्त बोलू नये वाद वाढतात. सगळं घर मुलीच्या खांद्यावरची जबाबदारी आहे सांभाळून ठेवायची. 

आपण बोलून वाद वाढवू नये. नवऱ्याचं ऐकावं. आपलं घर बांधून ठेवावं, पण मला एक प्रश्न आहे...मुलाकडे असं समजावलं जात असेल का? बायकोला मदत करावी, वाद टाळावेत, बायकोची साथ द्यावी, बायकोच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहावं यासारख्या अनेक गोष्टी....

गेल्या वर्षभरात माझ्या ऐकण्यात पाहण्यात किंवा अनुभवात आलेली वाक्य तर फार भयंकर आहेत. त्यावरून मला एकंदरीत असं वाटलं की एकतर मुलीला मोलकरीण समजतात किंवा विकायला ठेवतात तशी वस्तू समजतात. माफ करा असं म्हणण्याचं कारण म्हणजे ऑनलाइन नाव नोंदवलंय सब्स्क्रिब्शन संपण्याआधी लग्न जमलंच पाहिजे. नाहीतर पैसे वाया जातील असं कोण म्हणत असावं?  

मुलगा कसाही असला तरी आम्हाला चालेल पण तो जातीतलाच पाहिजे. मग पगारही कमी का असेल किंवा आणखी त्याच्यातील त्रुटीही मान्य. अरे बाकी सगळं तर चांगलं आहे नोकरीच सोडायला सांगतोय ना मग कुठे बिघडलं? सोड नोकरी काय त्या नोकरीत ठेवलेलं.

सकाळ संध्याकाळ जेवण करून घरातील सणवार करणारी आणि सगळं सांभाळणारी मुलगी पाहिजे. नाहीतर मुलगी नको. नोकरी करणारी तर हवी पण शनिवार रविवार सुट्टी हवी. 

सणवाराला सुट्टी हवी घरातलं कोण करेल. मी तर बुआ आईला आजारी असतानाच मदत केलीय तर आता तिनेच पाहायला हवं. आता गंमत अशी आहे की दुसरी बाजू मुलाची पण आहे बरंका ती फार मजेशीर आहे. 

बायकोला पाठिंबा दिला तर आई आणि समाजाच्या नजरेत बायकोचा बैल, नवरा-बायकोनं वाद टाळण्यासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तर हेच लोक उद्या घर फोडलं म्हणून ओरडणार. मुलगी स्वत:च्या पायावर उभं राहिली किंवा तिला सपोर्ट केला तर भाई इगोच हर्ट होतो. घरातल्यांचा तरी नाहीतर.... समजून घ्या. 

आता यामध्ये आंतरजातीय विवाह आणि मुलगा चांगला असणं हे भाग आणखीन वेगळे आहेत. कारण इथे समाज आणि काईंड ऑफ मानसिकता, वातावरण, वागणूक असे अनेक कंगोरे निघतात. 

या अख्ख्या लग्नाच्या धिंगाण्यात कोणीच हे पाहात नाही की मुलगी स्वत: 2 पैसे कमवायला शिकली तर अडीअडचणीला तिची मदत होईल. 

मुला-मुलीचं पटलं तर उद्या त्यांचा संसार सुखी होईल. आपल्याकडे जी बोलणारी तोंड आहेत ती कधीच मदतीला येत नाहीत. बोलणाऱ्यांना आज तुमचा विषय आहे उद्या दुसऱ्यांचा मिळेल. 

आज मुलगा चांगला कर्तुत्ववान आहे की नाही तो सपोर्ट करणारा आहे की नाही हे पाहायचं सोडून अजूनही आपण त्याच त्याच गोष्टीत गुरफटतोय. त्यातून होणारे वाद, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, छळवणूक आणि घुसमट ही दिवसेंदिवस वाढणारी आहे. ही फक्त मुलींचीच असं नाही बरं मुलांचीही तेवढीच आहे. 

डिमांड फक्त मुलींच्या दिसतात पण मागणी घालणाऱ्या कुटुंबाच्या नाही. ते मागणी करतात ती डोळ्यात दिसणारी नसते पण मुलीच्या स्वाभिमानाला नक्कीच ठेच पोहोचवणारी असते. 

नोकरी सोड सांगणं सोपं आहे पण ती मिळवण्यासाठी खेटे घालणं आणि धडपड करणं कठीण आहे. मला वाटतं सप्तपदीमध्ये आणखी काही वचनं द्यायला हवीत.जी फार गरजेची आहे. 

शेवटी समाज काय म्हणेल इथे सगळं अडतं हो. पण समाजातील लोक कधीच गरजेला तुमच्या मदतीला येत नाहीत. ना जातीतले. अहो इथे रक्ताचे लोक हात झाडायला कमी करत नाहीत. 

आपली जबाबदारी कशी संपेल याकडे लक्ष लावून असतात. शेवटी कामी येतात ती आपण आपल्या स्वभावातून जपलेली नातीच. तिथे कास्टचं किंवा समाजाचं बंधन नसतं पण तिथे नक्की आपुलकी असते. 

अडल्या नडल्या प्रसंगाला उभं राहण्याची ताकद असते. समजातील बोजाखाली आपण पुन्हा मागे जात आहोत. फक्त जबाबदारी संपवायची म्हणून एकदा लग्न उरकून मोकळे होत आहोत. 

मग पटलं तर ठिक नाही तर पटवून घ्या. नाहीतर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होतात ती वेगळी त्याला कारण आणि कंगोरेही वेगळे आहेत. 

पटत नाही म्हणजे काय शारीरिक भूक भागवण्यासाठी काही आपला रस्ता वेगळा निवडतात तर काही मानसिक गरज भागवण्यासाठी त्यामध्ये कोणीतरी एक फसतं तर कुणाचं तरी फावतं. नाहीतर आज आजूबाजूला एवढ्या बातम्या आणि घटना पाहायला मिळाल्या नसल्या. 

आता इथे संस्कार हा मुद्दा आणू नका. कारण मुळातच ते पितृसत्ताक पद्धतीनं वडिलांचा आणि थोरामोठ्यांच्या धाकातले संस्कार असतात. जिथे आईला स्वातंत्र्य कमी आणि वडिलांना जास्त असतं. त्यामुळे संस्कार नाहीत वगैरे या गोष्टी गौण आहेत. त्यासाठी आपले विचार बदलणं हाच एक मार्ग आहे.

आता मला पडलेले काही प्रश्न


लग्न का करावं? 

- जोडीदार मिळावा म्हणून आयुष्यभर साथ देणारा हवा म्हणून? मग तिथे वरील सगळ्या मुद्द्याचं काय?

- यामध्ये नकारात्मक भूमिका माझी नाहीय पण शिफ्ट ड्युटी किंवा नोकरीत काम करणाऱ्या मुलींना नोकरी सोडणं हा एकच पर्याय आहे का?

- सासूही कधीकाळी सून असते मग निवडलेल्या सूनेबद्दल इतकी इनसिक्युरिटी का? मुलगा बैल होईल, ती घर फोडेल, ती वाईट आहे.....ती गिळून टाकेल ही मानसिकता येते कुठून, मग लग्न करायचंच का? फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी?

- जर लग्न समजून घेणाऱ्या जोडीदाराशी करायचं तर तो निवडायचे निकश काय असायला हवेत? 

- मग समजूदार आणि कर्तुत्ववान मुलगा मिळाल तर जातीचे निकष किती लागू करायचे? मग वाळीत टाकण्याचे प्रकार होणार त्याचं काय?

- कोणतीच जात वाईट नाही कमी नाही किंवा उच्च नाही. प्रत्येकाचं अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. राजकीय मतांसाठी राजकीय दृष्टीनं मतांचं राजकारण होतच राहणार. त्याबद्दल मला आता तरी काही मत मांडायचं नाही पण मग जाती-जातीतील विचारसरणी कशी बदलणार?

- लग्नाची परिभाषा बदलतेय असं वाटतंय का? एक व्य़वसाय, एक फॅशऩ किंवा एक करार किंवा एक मोलकरीण म्हणून घरी आणणं यापैकी एक होतंय का? 

- मुलगा-मुलगी दोघांनी मिळून घर सांभाळलं तर बिघडलं कुठे? भूक तर दोघांनाही लागते मग तिनेच करावं हा अट्टाहास का? घर दोघांचं आहे मग तिनेच जबाबदारी घ्यावी हा हट्ट का? 

मी अजूनतरी या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरं शोधते आहे. माझ्या सोबतच्या मुलींची लग्न होत आहेत त्यांना एक एक वर्षांची मुलं आहेत. पण मला अजूनही हा प्रश्न त्रास देतोय लग्न करायचं तर का? नुसतं कुटुंब वाढवण्यासाठी? जबाबदारी संपवण्यासाठी? आपलं माणूस शोधण्यासाठी? की आणखी काही....

का नुसतं कुटुंब वाढवायचं आणि जबाबदारीतून हात झटकून इतरांसारखं पटपट बाहेर पडायचं म्हणून हे सगळं करायचं की खरंच आपला जोडीदार निवडायचा आणि आपलं माणूस शोधायचं म्हणून करायचं? तुमच्याकडे याचं उत्तर असेल तर नक्की मला सांगा. 

धन्यवाद!