नवरा माझं कौतुक करत नाही आणि त्याचं माझ्यावर प्रेमच नाही ही प्रत्येक स्त्रीची ही तक्रार असते. आपल्याला दिसतं आणि वाटतं तसं नसतं, हे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही. अगदी नवविवाहितांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्यात एक वेगळं प्रेम असतंच. कधी ते व्यक्त केलं जातं, तर कधी न व्यक्त होताही. वर्ष जशी सरतात तशी त्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते आणि प्रेमही अबोल होतं. मात्र तरीही नवरा कौतुक करत नाही हा पाढा मात्र कायम सुरूच असतो.
नवरा कौतुक करत नाही आणि त्यांचं प्रेमच नाही अशी सतत कुरकुर करणाऱ्या 70 वर्षांच्या काकूंवर काकांचं मात्र खूप जास्त प्रेम आहे. बऱ्याचदा काकूंना मात्र ते प्रत्यक्षात दिसत नसल्यानं किंवा काकांनी बोलून व्यक्त न केल्यानं गेल्या 40 वर्षांपासूनची काकूंची कुरकुर सुरू आहे. ही कुरकुर काका मात्र अगदी मिश्कीलपणे घेत तिच्यावर अपार प्रेम करतात. त्यांच्यातील या अबोल प्रेमाची ही छोटीशी कथा शब्दात मांडण्याचा प्रयत्न.
काका तसे खूप शांत, अगदी मोजकं आणि कामापुरतं बोलणारे. काकू मात्र त्याच्या अगदी बरोबर उलट्या स्वभावाच्या. सतत बोलून व्यक्त व्हायचं जे मनात आहे ते सांगून मोकळं होणाऱ्या. नवरा आपलं कौतुक करत नाही आणि आपल्यावर प्रेम नाही कायमच ते फक्त कामापुरतं बोलतात. बाकी त्यांना काही पडलेलं नसतं काकूंची कायम तक्रार असते. रोज दोघांनीही संध्याकाळी 4.30 वाजता एकत्र बसून चहा प्यायची त्यांची नियमित सवय. काम करून जास्त दमल्यामुळे सहज त्यांना पडल्यापडल्या झोप लागली. काका मात्र चहाच्या वेळेनुसार उठले. पाहिलं तर शांत झोपल्या होत्या. त्यांना पाहून काकांनी हळूच पडदा ओढून घेतला.
मला खाली दूध आणायला जायचं होतं. मी काकांना सांगून दूध आणायला निघाले. त्यावेळी काका हळूच म्हणाले, 'बेल वाजवू नको हा! काकू झोपली आहे; दारावर टकटक कर, मी दार उघडेन.' मी फक्त हसून दूध आणायला निघून गेले. मी दूध घेऊन घरी आल्यावर दारावर टकटक केलं तर काका खरंच दाराजवळ उभे होते. त्यांनी शांतपणे दार उघडलं आणि निघून गेले. काकूंची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी मला दाराची बेल वाजवू नको असं सांगितलं होतं. चहाची वेळ उलटून गेली असतानाही त्यांनी उठवलं नाही. काकांचं न बोलताही काकूंवर असणारं हे अबोल प्रेम त्यादिवशी मला जाणवलं आणि खूप अप्रूपही वाटलं.
दुसरा सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही काकांना घरी कायम काकूंनी जेवण वाढायला हवं असा हट्ट असायचा. अन्नपूर्णा असलेल्या आपल्या बायकोने जेवण वाढल्याशिवाय गळ्याखाली काही घास उतरायचा नाही. जेवण तयार असेल आणि काकूंनी वाढलं नाही तर ते हातानी घेत नाहीत. काकूची वाट पाहतात किंवा दूध ब्रेड खातात. पण तिने जेवण आपल्या हातानं वाढून द्यावं हा हट्ट मात्र त्यांचा आजही कायम आहे.
खरंच, आपल्याला बोलणाऱ्या किंवा व्यक्त होणाऱ्याच्या मनातील भावना, प्रेम दिसतं, कळतं, जाणवतं बोलून मोकळे होतात हे दिसतं. पण जे व्यक्त होत नाही त्यांना समजून घेणं आणि त्यांचे प्रेम कळणं फार कठीण आहे. काका प्रत्येक क्षणाला जरी प्रेम व्यक्त करत नसले तरी काकूंप्रती असलेली काळजी, जिव्हाळा आणि प्रेम हे कित्येकदा त्यांच्या कृतीतून दिसतं. खूप छोट्या गोष्टींचीही ते नकळत काळजी घेतात त्यात कुठेही दिखावा नसतो. 100 गिफ्ट, प्रेमाचे केवळ दोन शब्द आणि खोटी स्तुती करण्यापेक्षा त्यांनी अबोल पण चिरंतर असं हे प्रेम आपल्या मनात आणि कृतीत जपलं आहे. 40 वर्ष लग्नाला उटल्यानंतरही आज काकू कितीही कुरकुर करत असल्या तरीही ते कोणतीही तक्रार करत नाहीत. या उलट ते मिश्कीलपणे घेत तू बरोबर आहेस असं म्हणून तिचं मन राखण्याचा कायम प्रयत्न काका करतात.
क्रांती कानेटकर
-दिनांक- 15 मे 2020, मुंबई

खरया प्रेमाच उदाहरण म्हातारपणाचा अधार बोलु न दाखवून प्रेम समजायला लागल तर ते प्रेम नही स्वार्थ अणि sympathy जास्त वाटेल सुंदर लिहिला य
उत्तर द्याहटवाचांगले लिहिलंय. काका काकू समोर उभ्या राहिल्या.
उत्तर द्याहटवानकळत... एक सत्य भावनिक चित्र उभे राहिले.... जे आपण अनेक वेळा घरात आपल्या समोर चालु असलेल्या घडामोडी चा अंदाज लावायला विसरतो... पण तो या लेखात स्पष्ट समजतोय...खुप सुंदर...💐💐👌👌
उत्तर द्याहटवा...💐👌
उत्तर द्याहटवाअसं प्रेम प्रत्येक नात्यात असत. कधी व्यक्त करता येत नसते पण असत.
उत्तर द्याहटवा