रविवार, १४ जून, २०२०

संवाद संपला की वाद होतो? पण बोलायला खरंच वेळ आहे का? लॉकडाऊनमधला माझा अनुभव


प्रातिनिधिक फोटो

          काम करत असताना रविवारी (14 जून ) अचानक ट्वीट दिसलं. सुशांत सिंह राजपूतनं गळफास घेऊन आत्महत्या केली. एम. एस. धोनी हा मी पाहिलेला त्याचा चित्रपट. त्याच्या आत्महत्येबाबत आधी वाचून विश्वास बसेना, बातमी कन्फर्म आहे का हे पाहण्यासाठी इतर वेबसाईटवर शोधाशोध सुरू झाली आणि काही सेकंदात ही बातमी खरी ठरली. सगळ्यांनाच अचानक आलेल्या या बातमीनं मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो आणि कोट्स पुढच्या काही सेकंदात व्हायरल होऊ लागले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता सुशांतसोबत असं नेमकं काय घडलं असावं की त्याला आयुष्य संपवण्याची वेळ आली? दुसरं म्हणजे त्याचं मन मोकळं करायला खरंच हक्काची व्यक्ती नव्हती का की त्याला असा निर्णय घ्यावा लागला? य़ा प्रश्नांनंतर  सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरायला लागल्या आत्महत्या ही पळवाट आहे मनातल्या गोष्टी शेअर करायला हव्यात. बोलायला हवं... सगळं खरं असलं तरी माझ्या मनात आलेला सर्वात पहिला प्रश्न होता कुणाशी बोलायचं?
       स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपल्या व्यापात व्यस्त आहे. प्रत्येकाला या स्पर्धेत टिकायचं आणि जिंकायचं आहे. मोबाईल, टीव्ही, वेबसीरिज, ऑनलाइन खेळ आणि कामाचं शेड्युल या सगळ्यात हरवला आहे तो संवाद. हा संवाद कुणाशी आणि कसा साधायचा हाच मोठा प्रश्न आहे. ज्याला हे सगळं सांगावं ती व्यक्ती किती गोपनीयता बाळगेल? त्याचा गैरफायदा घेणार नाही ना? आपलं म्हणणं ऐकायला आणि समजायला त्याच्याकडे वेळ तरी आहे का? असे अनेक प्रश्न आजच्या या घटनेनंतर अधिक जास्त मला पडायला लागले.
हे प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण होतं ते म्हणजे लॉकडाऊनमध्ये माझं असलेलं एकटेपण. तुम्ही कितीही बतावण्या केल्यात तरी व्हर्च्युअल जगाचा एका लिमिटनंतर कंटाळा येतो. किमान मला तरी खूप त्रास व्हायला लागला. लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरापासून कित्येक किलोमीटर लांब एकटं राहायचं, जिथे बोलायला आणि भेटायला लॉकडाऊनमध्ये कुणी येऊ शकतं नाही. प्रत्येक जण आपल्या व्यापात किंवा गॉसिप करण्यात व्यस्त असतो. कुणाला फोन करून बोलायची आणि वेळ मागायचीही चोरी झाल्यासारखं वाटलं मला.
       गमतीचा मुद्दा असा की लॉकडाऊनआधीही असे किती आणि कुठे कुणी बोलायचे कारण जो तो मोबाईल आणि आपल्या व्हर्च्युअल जगात किंवा कामात बिझी असायचा. यावरून मित्र-मैत्रीणींसोबत अनेक वादही झाले पण संवाद काही होऊ शकला नाही. प्रत्येकनं सुचवलं वेबसीरिज पाहा, वाच, लिही किंवा सिनेमा बघ काहीच नाही तर झोप काढ. पण हे त्या सगळ्यांसाठी फार सोपं होतं असं वाटायला लागलं होतं; कारण ते घरात कुटुंबात राहात असल्यानं त्यांच्या भोवती माणसं होती. सलग 3 महिने एका खोलीत मोबाईल, लॅपटॉप आणि तुम्ही एवढंच राहिलं तर एका वेळेनंतर जे फ्रस्ट्रेशन येईल तशी माझीही चिडचिड पहिल्या महिन्यात वाढायला लागली होती. सतत माणसात राहाणं आणि बोलण्याची सवय असल्यानं एकटं राहण्याचा हा अनुभव फार वेगळा आणि सुरुवातील खूप त्रासदायक होता. आता मात्र हळूहळू या वातावरणाची सवय व्हायला लागली. राहून राहून आता मलाच माणसं किंवा होणारा संवाद हा फक्त कामापुरता व्हावा असं वाटू लागेल अशी भीती मनात यायला लागली. काहींना ही नक्कीच नकारात्मकता वाटेल पण एका लिमिटनंतर डोकं भणभणायला लागतं हे पण तितकंच खरं आहे. 
     आपल्याला लहानपणापासून माणसात राहण्याची किंवा सतत कोणीतरी सोबत असण्याची एक सवय झालेली असल्यानं हा एकटेपणा खायला उठतो. कितीही व्हर्च्युअल जग मोठं आणि चांगलं वाटत असलं तरीही आपल्या माणसांसोबत होणारा संवाद हा त्यापेक्षा जास्त आनंद देणार असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या स्वार्थी वृत्ती आणि आत्मकेंद्रीपणामुळे नात्यातील संवाद संपून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळालं. ब्रेकअप पासून ते घटस्फोटापर्यंतचं प्रमाण आणि लग्नानंतर केवळ नवऱ्याकडून प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर होणारे प्रेम प्रसंग ह्या गोष्टींचं प्रमाण कुठेतरी वाढतंय असं ब्लॉग, बातम्यांमध्ये वाचनात आलं. नात्यातला वाद आणि वाढणारं अंतर यामुळे आपण जवळपास अर्ध मशीन झालोच आहोत. येत्या काळात पूर्ण मशीन होऊ अशी भीती वाटायला लागली आहे. यामधून वाढणारा आत्मकेंद्रीपणा, प्रॅक्टीकलच्या विचारांच्या नावे आपण करत असलेल्या कृतीनं नात्यातील संवादाचा गळा घोटत आहोतच पण वादाला मात्र जागा करून देत आहोत.
      मन हलकं करण्यासाठी, नात्यातील प्रेम वाढावं, प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुटावेत म्हणून इथपासून ते अडीअडचणींना एकमेकांच्या पाठिशी उभं राहाता यावं म्हणून एकमेकांसोबत मनमोकळेपणानं संवाद साधायचा असतो. त्यातून घर, मित्र परिवार, आपली नाती तयार होतात. पण याच संवादाचा कुणीही गैरफायदा घेऊ नये किंवा गैरवापर करू नये ही एक धास्ती मनात असते. व्हर्च्युअल जगात ते ऐकायला कुणी नाही म्हणून कित्येकदा गोष्टी शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या तरी दोन गोष्टींची आतातरी गरज आहे असं मला वाटतं. जी आपल्या पातळीवर करता येईल. एकतर आपण इतकं एकटं राहायला शिकायला हवं की सगळं झेलायची ताकद हवी. आपल्याला कुणाचीही गरज पडणार नाही याची ठाम स्वत:च्या मनाला शाश्वती द्यायला हवी. थोडक्यात आपणच आरशासमोर आपलं शिल्पकार व्हायचं. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्या कामातून म्हणजेच दिवसातल्या 24 तासांतून किमान काही मिनिटं महत्त्वाच्या नात्यांसाठी वेळ देणं आणि संवाद साधणं... नाहीतर शरीरानं नाही पण मनानं मात्र अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ काही दूर नाही असं मला वाटतं...
- क्रांती कानेटकर
- दिनांक- 15 जून 2020, मुंबई

७ टिप्पण्या:

  1. खरंय, संवाद झाल्याशिवाय "माणूस"पण पूर्ण होणं अशक्य आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Shevatcha Vakya, Hi Gwahi deta ki..nakkich Adhi Mann Marat asava ani Mg sharirarvar ti vel yet asavi..Tyamule Tyala Adhi Nairashya Fasatun mokla Karna Garjecha ahe, Nahitr Galfaas lagna He Kadhihi Vaitch..Chaan Mandalayes Kranti..Keep It Up Nahi Mhannar Karan Ha Vishay ani Ashi Feeling Punha Tula Vatu naye Hich saddicha..Pn asa Changlya ritine Lekhanatun Mandata yenyachya Shailisathi tari nakkich 'Keep It UP' asa Mhanen..'Vyakta Hot Rahna Mahtvacha'.. Je Tu Tuzhya Kontya na kontya Tari satisfactory Margane Zaliyes..☺️

    उत्तर द्याहटवा
  3. जबाबदारी पार पाडून स्वकेंद्रित होता यायला हवं...अस झालं तर नकारत्मक विचार तुम्हाला शिवणारही नाही,उच्चशिक्षित असल्याने तोही त्याच्या क्षेत्रात निपुण होतच ,पण आयुष्याचा धडा त्याला नीट गिरवता आला नाही...अशी माणसं एखाद्याच्या बोलण्यानेही हळवे होतात, रडतात कोसळतात मग मनावरचे आघात कसे सहन करतील राहिला प्रश्न एकलकोंडे पणाचा जीवाचा वाटा केला की तो सहज सुटतो..

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान लिहिलंय. एकमेकांशी बोलणे फार महत्वाचे असते.

    उत्तर द्याहटवा
  5. थोडक्यात आपणच आरशासमोर आपलं शिल्पकार व्हायचं हे खर आहे. छान लिहिलय.

    उत्तर द्याहटवा