छंदोत्सव..
"छंद आहे तिथे आनंद, व्यासंग तिथे परमानंद".
किती
सुंदर ओळी आहेत या ओळी. नुकतीच छबिलदासच्या गल्लीतून जाताना नजर त्या छंदोत्सव नावाच्या बॅनरवर पडली. कुतूहल म्हणून का असेना एक क्षण काय असेल, म्हणून आत जाऊन पाहावं असं
वाटलं. सार्वजनिक वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर हे प्रदर्शन आहे हे वाचल्याक्षणी
मी तिथे गेले. प्रदर्शन फार भव्य दिव्य नव्हतं, किंवा प्रदर्शनात विकण्यासाठी वस्तूही
फारश्या नव्हत्या. होती ती फक्त कला आणि तिथे भेटला तो सच्च कलाकार...
तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते. सुरुवातीला अगदी
लोकरीच्या विविध विणलेल्या वस्तू, माग हॅन्ड क्राफ्ट, पेंटिंग्स, क्विलिंगपासून
बनवलेल्या नानाविध वस्तू, कागदापासून आणि टाकाऊ पासून टिकाऊ तयार केल्याजाणाऱ्या वस्तू,
इतकंच
काय तर अहो! आपल्याला एक छंद असतोच की, बस आणि ट्रेनची तिकीटं जपून ठेवायचा
तेही होता बरं का! विविध राज्यामध्ये आणि विविध वयोगटातील व्यक्तीसाठी असणारी
वेगवेगळ्या काळातली तिकीटं तिथे होती. हे कमी म्हणून की काय आतपर्यंत येऊन
गेलेल्या काडेपेट्यांचे बॉक्स आणि त्यावरचे चिन्ह हा हि छंदाचा विषय असू शकतो, हे त्या निमित्ताने पाहायला
मिळालं!
मला
संपूर्ण प्रदर्शनात आवडलेल्या 2 स्टॉलवर मी जरा जास्त बोलेन.एक गृहस्थ आहेत जे आवड म्हणून नारळाच्या
आणि शाहळ्याच्या करवंटीपासून विविध आकार आणि वस्तू तयार करतात.तर गोगटे नावाचे
दुसरे गृहस्थ आहेत जे स्वतः करवंटीपासून विविध कलाकृती तयार करून त्याचा व्यवसाय
करतात.या दोघांचेही स्टॉल समोरसमोर होते फरक हा होता एकाची आवड होती जी कलेतून सादर
केली आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचावी यासाठी त्याचं शिक्षण ते देत होते, तर दुसरे गृहस्थ त्याच करवंटीचा
वापर करून किचन, छोटा
दिवा, समई यांसारख्या
गोष्टी विकण्यासाठी तयार करत होते. अजून एक वेगळा स्टॉल पाहायला मिळाला तो म्हणजे
पत्त्यांचा...पत्ते म्हणजे जुगार! असं जरी समजलं जात असलं तरी विविध ठिकाणी
कोणकोणत्या आणि किती प्रकारचे पत्ते वापरले जातात, याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर
मांजरीच्या वेगवेगळ्या जातीचं महत्व सांगणारे पत्ते,विविध आकारातील पत्ते, इतकाच काय तर A4 साईझपेक्षा थोडे कमी आकाराचे
पत्तेही तिथे होते, जे भारतात छापले जातात आणि अमेरिकेत मोठया प्रमाणात विकले
जातात.
अजून एक
स्टॉल होता तो शिक्के आणि नोटांचा जो मला वेगळा वाटला;
पराग
रेडकर नावाचे उत्तम जाण असणारे गृहस्थ. जगभरातील विविध नाणीं आणि शिक्के फक्त छंद
आहे म्हणून जमवणे. हा छंद असला ; तरी त्या मागचा इतिहास आणि प्रत्येक नाण्या आणि शिक्यामगचा
असणारा इतिहास त्यांचं रहस्य, त्यातली गंमत याचा अभ्यास प्रत्येक छोट्या छोट्या
गोष्टी ते येणाऱ्या व्यक्तीला सांगत होते. एकूणच प्रदर्शनात मला आवडलेला भाग हा
शेवटचा होता कारण नुसती छंद म्हणून नाणी जमवणे खूप सोप आहे. पण त्या मागचा इतिहास
आणि अर्थशास्त्र अभ्यासपूर्वक सांगणं कठीण आहे.खूप गर्दी असल्यानं आणि आणि वेळेअभावी
मला त्यांची मुलाखत घेता अली नाही पण त्यांच्या ह्या अनमोल छंदाला मात्र दाद
द्यावीशी वाटली.आजचा दिवस आणि तो एक तास सार्थकी लागला असे छंद आपणही जोपासायला
हवेत असा एक मनात विचार ही काही क्षणांसाठी येऊन गेला.शेवटी म्हणतात ना भाव तेचि
देव आणि कला तिथे भाव याचा प्रत्यय मात्र आज यानिमित्तानं का होईना आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा