कुकरची शिट्टी वाजली तशी ती दचकली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपण सपशेल फसवले गेले आहोत याची जाणीव तिला झाली. प्रेमातून झालेली फसवणूक की आपला आंधळा विश्वास म्हणून आपण हा निर्णय घेतला या प्रश्नात ती अजूनही अडकून पडली होती. पण आता मागे फिरण्याचा कोणताच पर्याय तिच्याकडे उरला नव्हता. एकतर एकट्यानं जगायचं किंवा आहे ते मुकाट्यानं सहन करत प्रेमात मिळणारे धक्के पचवण्याची ताकद वाढवायची. तिचे डोळे ओघळत होते. काय करावं हे सुचत नव्हतं. लग्नाला अवघे दोन महिने होऊन गेले होते. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यानं माहेर आणि मित्रही तुटले होते. फक्त साहारा होता तो नवऱ्याचा पण तोही दिवसेंदिवस साथ सोडतोय की काय? याची भीती आता मनात घर करू पाहात होती. तुझ्यासाठी सगळं एडजेस्ट करतो म्हणणारा माझा सोहम आता रोज मीच कशी चुकते याचे धडे देत होता. आई त्याचे कान भरत होत्या आणि तो कोणताही न विचार करता बोलत सुटायचा, लग्नानंतर इतका बदलेल असं जराही वाटलं नव्हतं. 6 वर्षांच्या आमच्या प्रेमात त्यानं असं कधी केलं मात्र. पण या सगळ्याला त्याच्या आईचीच फूस असेल असं कधीही वाटलं नाही मात्र आता समोर येणाऱ्या गोष्टी आंधळ्या प्रेमाची साक्ष देताना आणि रोज थोडं मनाला मारत आहेत. आपण केलेल्या चुकीची शिक्षा देत आहेत.
‘अजून झालं नाहीच का तुझं. कासवाच्या गतीनं काम करते आहे. माझ्या मुलाला खाल्लंस आता या घरातल्या माणसांनाही माझ्याविरोधात नेऊ पाहातेय पण त्यांना काय माहीत ही किती आतल्या गाठीची आहे ते’. सासूबाई मागून जोरात ओरडत होत्या. घरातल्या सगळ्या गोष्टी करून नोकरी करून घरात पैसे देत असताना रोज मुलीऐवजी मोलकरणीसारखी वागणूक मिळत होती. यावर हळूहळू आता माझ्यात आणि सोहममध्ये वाद होऊ लागेल होते.
आज मात्र मी मनाशी पक्क केलं, आज काय वाटेल ते झालं तरी प्रत्येक गोष्टीचा जाब मात्र सोहमला विचारायचा. सोहम त्याचं काम आटपून संध्याकाळी घरी आला होता. कामाचा ताण जास्त होता का? कसा गेला दिवस? मी पाण्याचा ग्लास पुढे करत त्याला विचारलं. त्यांनं उत्तर देणं टाळलं आणि खोलीत निघून गेला. मला वाईट वाटलं कारण एकमेव सपोर्ट करणारा सोहमही आता माझ्यासोबत फटकून वागत होता. रात्री सगळेजण जेवायला बसलो. आज मी पहिल्यांदाच शेपूची भाजी केली होती. मी केलेल्या भाजीत हलकी हळद टाकली म्हणून सासूबाईंनी ती भाजी रागानं खाल्लीच नाही. नाकं मुरडत त्यावर चार नावं ठेवून मोकळ्या झाल्या. मी सोहमकडे पाहिलं. तो जेवणात मग्न होता. त्याला काही कशाचं मुळी पडलेलं नाही. मी मुकाट्यानं एकच पोळी खाऊन उठले सर्वांची जेवणं आटपली आणि सगळं आवरून खोलीत आले. सोहम आपल्या फोनमध्ये बिझी होता.
सोहम मला तुझ्यासोबत बोलायचं आहे.- मी
हा काय गं बोल ना लक्ष आहे माझं- सोहम
असं नाही, मला खरंच काहीतरी सांगायचं आहे- मी
मी दमलोय आणि तू तेच तेच सांगणार जे मी गेले कित्येक दिवस ऐकतोय आणि तुझी समजूत काढतोय- सोहम
अरे पण आपलं एकमेकांवर प्रेम आहे. तू मला साथ देणं आपेक्षित आहे. तू लग्नाआधी तसं मला तसं प्रॉमिस केलं होतं.- मी
हो की मी कुठे साथ सोडली आणि माझ्या आईला काम लागलेलं मला आवडणार नाही हे मी तुला लग्नाआधीही बोललो होतो.- सोहम
ऐक ना पण मी सगळं करून घर सांभाळते. माझी त्याबद्दल तक्रार नाही पण आईंनी समजून घ्यायला हवं ना थोडं. त्याही या स्टेजला होत्याच ना कधीतरी- मी
इतर मुली करतात मग तुला का नाही जमत, उगाच काम करायचं नाही म्हणून कारण देऊ नको आणि माझं डोकं फिरवू नको. आई तुला तुझ्या चांगल्यासाठीच बोलते.- सोहम
अरे हो पण किती? जाता येताना घालून पाडून बोलत असतात. तूही त्यांची बाजू घेतोस. लग्न करून मी चूक केली का? लग्नाआधीच सगळं तोडलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे- मी
काय बोलतेय तू. प्रेम आहे आपलं आणि होईल सगळं नीट. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय तू प्लीज असं काही करू नकोस असं म्हणत त्यानं मला जवळ घेतलं आणि कपाळावर किस केलं. त्याला माझं प्रेम हवंय की घरात राबायला मी हवीय असा प्रश्न एक क्षण मनात आला. त्यानं मला कुशीत घेतलं आणि तो मात्र शांत झोपी गेला जसं काही घरात घडतंच नाही असं. मी मात्र मनातल्या विचारांनी अस्वस्थ होते. पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत होते.
- क्रांती रवींद्र कानेटकर



